मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच आणि एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरु आहे. विधान परिषदेची जागा उबाठाला हवी असेल तर राज्यसभेची जागा कॉंग्रेसला द्यावी लागेल, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर गेले तर वर्षभरानंतर राज्यसभा निवडणुकीत आपला पत्ता कट होऊ शकतो म्हणून आपल्या खासदारकीची चिंता लागलेले संजय राऊत हे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असल्याचा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरचे काम केल्याने आणि देशांमध्ये निवडणुका व्यवस्थित पार पडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत श्री . बन म्हणाले की, माझी मागणी आहे की संजय राऊत यांना काँग्रेस रत्न पुरस्कार देण्यात यावा. कारण राहुल गांधीही काँग्रेसची बाजू मांडत नाहीत त्यापेक्षा जास्त चांगली बाजू संजय राऊत मांडतात. काँग्रेसची गुलामी करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जातेय. मीठ उद्धव ठाकरे यांचे खायचे आणि चाकरी काँग्रेसची करायची हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे. संजय राऊत यांचे प्रगल्भ नेतृत्व मिळाल्यामुळे बुडणाऱ्या काँग्रेसला थोडे अच्छे दिन येतील, अशी टीका श्री. बन यांनी केली.