पोलादपूर (शैलेश पालकर) -आंबेनळी घाटात संरक्षक कठड्यालगत मोटारसायकल अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याठिकाणी अपघात झाल्याची शक्यता लक्षात घेऊन करण्यात आलेल्या रेस्क्यू मोहीमेत 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या मोटारसायकलवरील जोडप्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. दोन दिवस चाललेल्या या अत्यंत कठीण आणि जीवघेण्या मोहिमेअंती जोडप्याचे मृतदेह आढळल्याने अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे दोन्ही जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलीस हेकाँ स्वप्निल कदम तसेच कुंभरोशी व प्रतापगड परिसरातील युवक कार्यकर्त्यांनीही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले.