लांजा: नगरपंचायतीतर्फे मार्च अखेरीस राबविण्यात आलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून वसुलीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर घरपट्टीची ९६.४२ टक्के तर पाणीपट्टीची ९७.७३ टक्के इतकी वसुली करण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. त्यामुळे या वसुली मधून नागरिकांचा कर भरणा वाढल्याचे दिसून आले.

नगरपंचायतीच्यावतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी नगरपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याबाबत नागरिकांना वारंवार आवाहन केले होते. तसेच थकबाकीदारांना बिले देऊनही काहींनी थकीत रक्कम न भरल्याने मार्च महिन्यात अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. यानंतरही कर न भरणाऱ्यांविरोधात नळजोडणी तोडण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. या इशाऱ्याचा परिणाम होऊन अनेकांनी थकीत रक्कम तत्काळ भरल्याने वसुलीला गती मिळाली.