चिपळूण : दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या पंचकोशाधारीत गुरुकुल विभागामध्ये वर्षांत उपासना कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सौ. अर्चना बक्षी मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
गुरुकुल विभागाच्या शाळा समिती अध्यक्ष सौ.सारिका भावे, सदस्य सौ.मंजुषा चितळे, युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री.बनसोडे सर, उपमुख्याध्यापिका सौ. कारदगे मॅडम,पर्यवेक्षक श्री. मुंढेकर सर, पालकवृंद आणि गुरुकुलातील आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सुरुवातीच्या सत्रात वर्षान्त उपासनेचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर झालेल्या सभेच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर या शैक्षणिक वर्षात जून मध्ये झालेल्या वर्षारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वर्षभरासाठी ठरवलेल्या संकल्पाच्या पूर्ततेचा आढावा विद्यार्थ्यांनी सांगितला.
या नंतर सौ.बक्षी मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. ओघवत्या वक्तृत्व शैलीत अनेक उदाहरणे, दाखले देत, गोष्टी सांगत त्यांनी मिश्र वयोगटाच्या श्रोत्यांना खिळवून ठेवले. मोबाईलचा विवेकी वापर करण्यापासून ते नागरी जबाबदाऱ्यांपर्यंत अनेकविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.
गुरुकुलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या कुमारी रिधिमा सचिन पवार हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पालकांनी गुरुकुल विभागाला संगणक संचाची भेट दिली. त्यांनी दिलेल्या या उपयुक्त देणगीबद्दल विभागामार्फत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांगितिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अशा रीतीने वर्षांत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
