चिपळूण : बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन करणे खूप आवश्यक आहे. आपण चरित्रे वाचायला हवीत, त्यातील संघर्षातून व्यक्तिमत्त्वे उभी राहिलेली व्यक्तिमत्त्वे प्रेरणा देतात. आज मुळात वाचन कमी झालेले असताना, ए.आय. तंत्रज्ञान शाळेपासून हवंय का? अशा मुद्द्यांचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक निहार कोवळे, विकी लवेकर, शशिकांत मोदी, मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ यतीन जाधव, डॉ. आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर होते. आ. निकम पुढे म्हणाले, स्व. गोविंदराव निकम यांनी पूर्वी ‘गाव तिथे वाचनालय’ अशी संकल्पना राबवली होती. जगण्याचा आनंद मिळेल असा छंद जोपासण्याचे आवाहन निकम यांनी केले. शालेयस्तरापासून वाचन आवश्यक आहे. देशातील स्पर्धा परीक्षेत बिहारची मुलं चमकतात कारण तिथे लहानपणापासून मुलांना स्पर्धा परीक्षासाठी तयार केले जाते असेही ते म्हणाले.