खेड :- येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माहे एप्रिल २०२६ मध्ये दिलेल्या जे.ई.ई.,बी.आर्च. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या शाळेची विद्यार्थिनी कु. जिया मेहता हिने अभूतपूर्व यश संपादन करत भारतामध्ये द्वितीय क्रमांक (जनरल-इडब्ल्यूएस कॅटेगरी) पटकावला आहे.
कु. जिया हिने ९९:९७ पर्सेंनटाईल गुण मिळवून खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. कु. जियाने सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. जे.ई.ई बी. आर्च. ही देशातील अत्यंत कठीण समजली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. अशा कठीण परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक मिळविणे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. खेडवासियांना तर कु. जिया हिचा विशेष अभिमान वाटत आहे. याची दखल ना. योगेश कदम यांच्या पत्नी सौ. श्रेया कदम यांनी घेतली असून नुकताच त्यांनी कु. जिया हिचा विशेष सत्कार करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला,नगरसेवक संजय मोदी,बांधकाम सभापती सुनील दरेकर, उपशहरप्रमुख अंकुश विचारे आणि मेहता कुटुंबिय होते.
खेड येथील रोटरी स्कूलच्या जिया मेहता हिचा जे.ई.ई. बी.आर्च. परीक्षेत भारतात द्वितीय क्रमांक – समाजसेविका श्रेया कदम यांनी केला सत्कार
