चिपळूण : – येथील मिलिटरी बॉईज हॉस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांचे भव्य स्नेहसंमेलन उद्या शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे तसेच आर्मीमध्ये कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्यासाठी चिपळूण येथे एकत्र येणार आहेत.
गेल्या ३५ वर्षांतील तसेच मागील २५ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ही स्नेहभेट विशेष ठरणार असून त्या काळातील सुपरिटेंडंट यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. हॉस्टेलमधील शिस्तबद्ध जीवन, सकाळची प्रार्थना, रूम साफसफाई, एकत्रित जेवण तसेच त्या काळातील खोड्या, मस्ती आणि शिक्षा यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.
“हे स्नेहसंमेलन म्हणजे पुन्हा एकदा तारुण्यात गेल्यासारखे वाटणार आहे,” असे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय अध्यक्ष तथा सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांनी सांगितले.