चिपळूण वार्ताहर – वृक्षलागवड करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण निसर्गाला काही दिले तर निसर्ग भविष्यात आपल्याला उत्तम हवा देऊ शकतो. वृक्ष छोटा आहे की मोठा आहे यापेक्षा तो वृक्ष किती ऑक्सिजन देणारा आहे, तो वृक्ष वाढविण्यासाठी किती सेवा करावी लागणार आहे, याचा अभ्यास करूनच वृक्षलागवड होणे गरजेचे आहे. ‘एक संध्याकाळ निसर्गातील आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी’ असा कार्यक्रम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. माणसाने स्वतःच्या आयुष्यात किमान २५ वृक्ष लावून ते वाढविणे गरजेचे आहे, असा सल्ला निसर्ग संरक्षक विजयभाऊ भिडे यांनी दिला.
जागतिक वनदिनानिमित्त चिपळूणमधील निसर्ग सेवा करणाऱ्या ‘आम्ही मिळून सारे’ या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग सेवक विजयभाऊ भिडे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, डॉ. रत्नाकर थत्ते, श्री. विजयभाऊ भिडे हे विराजमान होते. यावेळी उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर यांनी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. निसर्गसंपदा टिकवली तरच भविष्यातील पिढीला त्रास होणार नाही. यासाठी निसर्गसंवर्धन करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आम्ही मिळून सारे’ या संस्थेचे डॉ. रत्नाकर थत्ते यांनी केले. त्यांनी संस्थेची १३ वर्षांची माहिती विशद करून वृक्षलागवड आणि त्याचे आयुर्वेदातील महत्त्व उदाहरणांसहित सांगितले. त्यामुळे उपस्थितांना वेगवेगळ्या औषधांची माहिती मिळाली. यावेळी संस्थेचे सदस्य शशिकांत मोदी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लीना जावकर यांनी केले.
यावेळी निसर्ग रक्षक विजय भिडे यांचा सत्कार संस्थेचे सदस्य व नगरसेवक विकी नरळकर यांच्या हस्ते झाला. चिपळूण नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारीपदी नुकतीच नेमणूक झालेल्या संस्थेचे सदस्य श्री. प्रमोद ठसाळे यांचा सत्कार समाजसेवक संतोष इनामदार यांच्या हस्ते झाला. तसेच वीज मंडळ पतसंस्थेच्या चेअरमनपदी संस्थेचे सदस्य जितेंद्र जावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समाजसेविका सुमती जांभेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
चिपळूण नगरपरिषदेनं वसुंधरा अभियानात कोकणात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर यांचा सत्कार उपनगराध्यक्ष सौ. दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या नेत्रदीपक रांगोळ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. वृक्षपूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी निसर्गाबाबतच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी माधवी भागवत यांनी निसर्गाबद्दलचे काव्यवाचन केले. यावेळी सभापती रसिका देवळेकर, राणी महाडिक, हर्षाली पवार, वैशाली निमकर, शीतल रानाडे, उमा देसाई, कांचन शिंदे, अंकुश आवळे, अजय भालेकर, रंजिता ओतारी, संतोष इनामदार, नरेंद्र बेलवलकर आदी निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अपर्णा नातू, शैलेश सावंत, मंगेश गोंधळेकर, माधवी भागवत, संगीता जोशी, संदेश किंजळकर, सौ. मानसी मुदलियार, सुनील शिंदे, उमेश घाडगे, सुरेश जाधव, रमेश कवडे, अंजली गोंधळेकर, शक्ती चव्हाण, मंजिरी नरवणे आदींनी विशेष मेहनत घेतली. हा सोहळा रामतीर्थ गार्डन येथे नुकताच पार पडला.
