जळगाव : येथून जवळच असलेल्या पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेने व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सहकार्याने श्री शंकर महाराज मंदिराचा भूमिपूजन समारंभ खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे येथील ओम जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने पाळधी येथे श्री शंकर महाराज मंदिरासोबतच श्री गणेश, श्री शिवमंदिर व हनुमान मंदिर बांधण्यात येणार असून, ध्यान मंदिर, अखंड धूनी व कीर्तन, प्रवचन, सामुदायिक पारायण आदी कार्यक्रमासाठी सभागृह, भक्तनिवास बांधण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे जळगावचे शाखाध्यक्ष उमेश झंवर यांनी दिली. ओम जय शंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सु.द.उर्फ पप्पाजी पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मंदिरे होत असून, लवकरच ही कामे पूर्ण होतील, असे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गजानन पत्की यांनी सांगितले. कांचनताई राणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास श्री साई मंदिर ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सुनील झंवर, शरद कासट, अनिल कासट, उद्योजक संतोष जैन, अजितदादा क्षीरसागर, शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक दिलीप पोकळे, मालेगावचे नगरसेवक मदनबापू गायकवाड, सहकार निबंधक गौतम बलसाने, सहाय्यक निबंधक विशाल ठाकूर आदींसह भाविकांची उपस्थिती होती