चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडकल्याने हा अपघात घडला. महेश अरुण गुडेकर (वय ५० वर्षे, रा. श्री समर्थनगर, सी-विंग, कापसाळ, डिगेवाडी, ता. चिपळूण) असे अपघात स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी भरधाव वेगात असल्याने महेश गुडेकर हे गाडीसह रस्त्यावर बरेच अंतर घासपटत गेले आणि महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला जाऊन आदळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत महेश गुडेकर यांचे भाऊ आणि रिक्षाचालक राजेंद्र अरुण गुडेकर (वय ५२ वर्षे, रा. काविळतळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत चालकाविरुद्धच हयगयीने व भरधाव वेगात गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शनिवार, १६ मे रोजी रात्री १२ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.