मुंबई : सूत्रांचा हवाला देऊन जाणूनबुजून पक्षाच्या विरोधात बातम्या दिल्या गेल्या आहेत. काही सूत्रे पगारी म्हणून आमच्या पक्षामध्ये पेरली असावीत, असा आमचा ठाम संशय असून, बातम्या पेरल्या नाहीत तर पगार मिळणार नाही म्हणून काहीतरी पेरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोल करतानाच सत्ताधारी आमदार विरोधी पक्षात जाऊन बसतील, अशा प्रकारची बातमी लावणे तार्किकदृष्ट्या पटत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास अनेक लोक इच्छुक आहेत. तुतारीचा एखादा आमदार सोडला, तर बाकी सर्व आमदार त्यामध्ये रोहित पवार यांच्यासहित इच्छुक आहेत, असा स्पष्ट दावा करतानाच अजितदादा हयात असताना रोहित पवार हे सातत्याने “तुमच्या पक्षात घ्या” अशी वारंवार विनंती करत होते, असा गौप्यस्फोट उमेश पाटील यांनी केला.

आमच्या पक्षात संशयाची सुई पेरण्यासाठी आणि आमच्या पक्षाबद्दल नकारात्मकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून रोहित पवार अशा प्रकारे बातम्या पेरत असतील, तर ते गैर आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार अजितदादा हयात असताना प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. आपल्या पक्षाचे आमदार-खासदार फुटू नयेत, यासाठी पवार कुटुंब कसे एकत्र आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवार करत असून, आपल्या हातून आमदार-खासदार जाऊ नयेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. कृपया सूत्रांच्या हवालीने किंवा कोणतेही पुरावे नसताना बातम्या देऊ नयेत. तसेच सूत्रांची विश्वासार्हता आहे का, हेही पाहणे गरजेचे आहे, असेही उमेश पाटील म्हणाले.