पेण (प्रशांत पोतदार) : मुंबई-गोवा महामार्गावर २३ मे रोजी पहाटे एका खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. पशुसंवर्धन कार्यालयासमोर, अंतोरे फाटा येथे पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी एमएच ०३ इजी९२७७ क्रमांकाच्या बसने अचानक पेट घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरची बस चिपळूणहून घाटकोपरकडे जात होती. सुदैवाने आगीच्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. चालक व वाहकही सुखरूप आहेत. आगीची माहिती मिळताच पेण नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.
