चिपळूण (प्रतिनिधी):- चिपळूण येथे प्रस्तावित असलेले छत्रपती श्री संभाजी महाराज सैनिक संकुल चिपळूण ऐवजी सातारा येथे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ. शेखर निकम यांनी माजी सैनिकांसमवेत माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री ना. शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. यावेळी ना. शंभूराजे देसाई यांनी येत्या अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन राज्यपाल यांच्याकडे शिफारस करू, अशी ग्वाही ना. देसाई यांनी आ. निकम यांच्यासह माजी सैनिकांना दिली.
यावेळी आ. शेखर निकम यांच्यासह माजी सैनिक गणेश सुर्वे, आत्माराम कदम, उमेश महाडिक यांनी ना. शंभूराजे देसाई यांच्याकडे चिपळूण येथे प्रस्तावित असलेल्या माजी सैनिक संकुलाबाबत सविस्तर चर्चा करून चिपळूण येथेच सदरील संकुल चिपळूण येथेच व्हावे, अशी आग्रही मागणी केली. यानंतर निवेदन दिले. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील वीर माता-पिता, वीर नारी, माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबितांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा तसेच सीएसडी व ईसीएचएससारख्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार व दुर्गम भाग लक्षात घेता अनेकांना दूरवर प्रवास करावा लागतो, ज्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात खेड व चिपळूण तालुक्यात माजी सैनिक व सेवारत सैनिकांची संख्या सर्वाधिक आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
