चिपळूण : घरकुल लाभार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाच ब्रास वाळू द्यायचे धोरण निश्चित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे १८००० घरकुल लाभार्थी आहेत परंतु महसूल विभाग यामध्ये कुचराई करत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी या मोफत वाळू पासून वंचित राहिले आहेत.
सुमारे सहा महिन्यापासून हे लाभार्थी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच तहसीलदार कार्यालय येथे अनेक वेळा खेपा मारून दमले आहेत. काहीतरी कारण सांगून त्यांना परत पाठवले जात आहे. कोणत्याही यंत्रणेने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सामाजिक कार्यकर्ते भरत लब्ध्ये यांनी रत्नागिरी जिल्हा खनिकर्म अधिकारी जोशी मॅडम,चिपळूणचे तहसीलदार लोकरे साहेब यांच्याशी अनेक वेळा संवाद साधला. परंतु ठराविक लाभार्थ्यांना वाळू देण्यात आली आहे. वाळू सर्वांना देणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना योग्य उत्तरे दिली जात नाहीत त्यामुळे सोमवार दिनांक 25 मे रोजी पुन्हा एकदा भरत लब्ध्ये यांनी तुळशीराम पवार व इतर सहकाऱ्यांसमवेत तहसील कार्यालयात जाऊन याची माहिती घेतली असता कार्यालयाकडून पाच ते सहा ब्रासच वाळू शिल्लक असल्याचे सांगितले.
त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधला असता सुमारे चौदाशे आठ ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. एवढी वाळू शिल्लक असताना महसूल यंत्रणा या गरीब लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहे. दिशाभूल करत आहे. याचाच अर्थ महसूल खाते बेजबाबदारपणे काम करीत आहे. कामकाजात कोणताही ताळमेळ नाही. आता घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे सोबत तहसीलदार कार्यालय या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
