रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनिंग धान्य आणि केरोसीन दुकानदारांना त्यांनी केलेल्या धान्य वितरणाचे कमिशन अद्याप मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. यासोबतच केरोसीन आणि धान्य वितरणात अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या असून, या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी ‘रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटने’ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष अशोकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, या मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील दुकानदार केरोसीन वितरण करण्यास तयार नाहीत, असा इशाराही संघटनेने दिला आहे.धान्य वितरण सुरळीत ठेवणाऱ्या या दुकानदारांना गेल्या काही महिन्यांचे कमिशन न मिळाल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. जिल्हा प्रशासनाने या सर्व गंभीर मुद्द्यांचा तात्काळ विचार करावा, वितरणातील तांत्रिक दोष दूर करावेत आणि केरोसीन तसेच धान्य वितरण व्यवस्था पूर्ववत सुरळीत करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.