मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने दिनांक १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
‘भारतातील आर्थिक राजकीय संकटे-वास्तव आणि परिणाम’ विषयावर हे चर्चासत्र असून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अर्थतज्ज्ञ अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी हे या चर्चासत्रात सहभागी होत आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत.
देश सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, कामगार क्षेत्रावर संकट आले आहे. नवीन नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, उलट कंत्राटी पद्धतीने नोकरभरती केली जात आहे. नोटबंदी व जीएसटीमुळे कृषी क्षेत्र व उत्पादन क्षेत्र पूर्णपणे कोलमडून पडले आहे. बँकिंग आणि विमा क्षेत्रही धोक्यात असून देशात फक्त २-३ बँकाच शिल्लक ठेवण्याचा घाट घातला जात आहे. वित्तीय क्षेत्राचे परदेशीकरण हा सर्वात मोठा धोका आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. या अत्यंत गंभीर मुदद्यांवर या चर्चासत्रात अर्थतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली आहे.