मुंबई : मुंबईकरांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रशासकीय अडचणी दूर करून सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेबाबत प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा, त्यात कालसुसंगत बदल करण्यासाठी काय सुधारणा आवश्यक आहेत, त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा.

अत्याधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तसेच, महानगरपालिका रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. यापुढे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा आणि उपक्रमाबाबत नियमितपणे आढावा बैठक आयोजित केली जाईल, असेही श्री. शेलार यांनी नमूद केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य खात्याबाबतची सद्यस्थिती आणि आधुनिकरण यासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक ८ जून २०२६) पार पडली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. शेलार हे बोलत होते.