मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एनडीए’ची बैठक दिल्ली येथे बुधवार दिनांक १० जून रोजी बोलावली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक ११ जून रोजी दुपारी २ वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बैठकीला देशभरातील ‘एनडीए’चे घटक पक्ष आणि त्या घटक पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीला जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने मुख्यमंत्री यांच्यामार्फत आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी आणि मला बैठकीला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

दोन वर्षापूर्वी जनतेने तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी आणि एनडीएला देशाची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली. सलग तीन वेळा संधी मिळाल्यानंतर देशाची प्रगती… देशाचा विकास… जगभरात युध्दाचे सावट असताना देशाच्या प्रगतीत तितकीच केलेली वाढ अशा या दोन वर्षे पूर्ततेचा एक आढावा किंवा बैठक ही आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीत सहभागी झालो होतो. अशावेळी नरेंद्र मोदींचा गौरव तर आहेच एनडीएच्या भक्कमपणाने… देशात एकसंघपणाने जी वाटचाल होतेय त्या कुशल पुढील वाटचालीचेसुध्दा त्या बैठकीत मंथन होऊ शकते हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.