महाड : महाड शहरात आज दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पेट्रोलने भरलेल्या कॅन घेऊन जाणाऱ्या दुचाकीला अचानक आग लागल्याने दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभी असलेली व्हॅगनार कार जळून खाक झाली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिमरन मोटर्स सर्व्हिस सेंटरच्या बाहेरील सर्व्हिस रोडवर दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, संजेश नथुराम साळुंखे ( रा. कोल ता. महाड ) यांनी आपली व्हॅगनार कार (क्र. एमएच-०६-बीयू-७७३०) दुरुस्तीसाठी सिमरन मोटर्स येथे दिली होती. मात्र ही कार सर्व्हिस सेंटरच्या आवारात न ठेवता बाहेरील सर्व्हिस रोडवर उभी करण्यात आली होती.
याचवेळी माजित देशमुख (रा. महाड ) हा त्याची दुचाकी (क्र. एमएच-०६-बीके-१९५९) घेऊन तेथून जात होता. दुचाकीवर दोन मोठे पेट्रोलचे कॅन तसेच दोन ते तीन बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. सिमरन मोटर्सजवळ पोहोचताच दुचाकीमधून स्पार्क निर्माण झाला आणि पेट्रोलच्या कॅनला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले.
पेट्रोल रस्त्यावर सांडून वाहू लागल्याने आगीच्या ज्वाळा समोर उभ्या असलेल्या व्हॅगनार कारपर्यंत पोहोचल्या. कारच्या टायरने पेट घेतल्यानंतर संपूर्ण वाहन आगीच्या विळख्यात सापडले. दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही वाहने अक्षरशः जळून खाक झाली.
घटनेनंतर दुचाकीस्वार माजित देशमुख हा घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महाड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. त्यानंतर महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
महाडमध्ये पेट्रोलच्या कॅनमुळे भीषण आग; दुचाकीसह व्हॅगनार कार जळून खाक
