रत्नागिरी : संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवरुख व संगमेश्वर येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी व शहराध्यक्ष हनीफभाई हरचिरकर यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष म्हणून अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आधारित असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक साळवी, महिला तालुकाध्यक्ष मानसी करंबेळे, शहराध्यक्ष हनीफभाई हरचिरकर, युवक शहराध्यक्ष रवींद्र लाड, बाळूशेठ ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नगरसेवक यशवंत गोपाळ, नगरसेवक दीपक खेडेकर, राजू वणकुंद्रे, तुकाराम येडगे, सुभाष चव्हाण, उत्तम पवार, बाळूशेठ वनकर, मंदार पाष्टे, कल्पेश पिळणकर, सोशल मीडिया अध्यक्ष अद्वैत पवार तसेच महिला पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आरुषी घवाळी, बने मॅडम, महिला तालुका संघटक पूर्वा उत्तम पवार, गुरव मॅडम, संजना नलावडे मॅडम आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
