मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या शिवबंधनात वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ताकद उरलेली नाही. आणाभाका देऊन वा शिवबंधन बांधून आमदार, खासदार टिकत नाहीत तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे बंधन लागते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांबद्दल ना प्रेम उरले, ना माणुसकी उरली, ना आपुलकी.
त्यामुळे उबाठा गटाचे आमदार, खासदार सातत्याने पक्ष सोडून प्रेम, आपुलकी आणि माणुसकीच्या बंधनात अडकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शपथा, शिवबंधनाला काहीही अर्थ नाही हे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात, असे सांगणे हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या आमदार, खासदारांना मातोश्रीच्या दरवाजातून परत पाठवतात. मुळात संजय राऊतांनाही अनेकदा मातोश्रीत प्रवेश मिळत नाही हे वास्तव आहे. हा विनोद कॉमेडी सर्कसमध्ये सांगितला तर प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होईल, असे म्हणत श्री. बन पुढे म्हणाले की ज्यांना प्रत्येक गोष्ट पैशांत मोजायची, भ्रष्टाचार करायची सवय आहे. असेच लोक खरेदीविक्रीची भाषा करणार. मुळात खरेदीविक्री करण्याचा अनुभव संजय राऊत यांना जास्त असेल. कारण पत्राचाळीत मराठी माणसांना देशोधडीला लावून खरेदीविक्री कोणी केली याचे उत्तर एकदा संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे.
