रायगड ( मनोज खांबे ) : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाडकरांना शनिवारी सायंकाळी अखेर दिलासा मिळाला. सुमारे पाऊण तास कोसळलेल्या पावसाने केवळ बळीराजाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही सुखावून टाकले. उन्हाच्या तीव्र झळांनी त्रस्त झालेल्या महाड शहरासह तालुक्यात या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून सर्वत्र नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसून येत आहे.
रविवारी सकाळी महाड येथील पाच नंबर शाळेच्या मैदानावर एक वेगळेच आणि मनाला स्पर्शून जाणारे दृश्य पाहायला मिळाले. मैदानात साचलेल्या पावसाच्या पाण्यात सहा ते सात भटकी कुत्री आनंदाने बागडत होती. पाण्याच्या डबक्यांमध्ये उड्या मारत, एकमेकांशी खेळत आणि मुक्तपणे धावत ती जणू पावसाच्या आगमनाचा आनंद साजरा करत होती.

शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आशेचा किरण ठरला असून, कोमेजत चाललेल्या भातरोपांना आणि तहानलेल्या जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे. त्याचवेळी पावसाच्या थेंबांनी मुक्या जीवांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवला. निसर्गाच्या या अविस्मरणीय क्षणाने महाडकरांच्या मनात समाधानाची भावना निर्माण केली आहे.
“पाऊस पडला… बळीराजा हसला… आणि मुक्या जीवांनीही आनंदाने डबक्यात उड्या मारत त्याचे स्वागत केले!”