लांजा : (गोविंद चव्हाण) तालुक्यातील इसवली-पाथरवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने रविवारी दुपारी सुखरूप सुटका केली. अवघ्या तासाभरात राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेमुळे बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इसवली गावातील ग्रामस्थ अक्षय गुरव यांनी २१ जून रोजी, रविवारी सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास इसवली-पाथरवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती लांजा वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ हालचाली सुरू करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर लांजा वनपरीमंडळाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बिबट्याच्या सुरक्षित सुटकेसाठी दोरीच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात सुरक्षितपणे अडकला. त्यानंतर पिंजरा वर ओढून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. दुपारी १२.३५ वाजेपर्यंत संपूर्ण बचाव मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.