चिपळूण : “मधुमेह हा एक ‘सायलेंट किलर’ (शरीराला पोखरत जाणारा) आजार आहे. त्याची लक्षणे सुरुवातीला सहज दिसून येत नाहीत, मात्र त्याचा आघात माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो.

केवळ रक्तातील साखर वाढणे म्हणजेच मधुमेह नव्हे, तर त्यामुळे ज्यांचे वय ३५ वर्षांच्या पुढे आहे, किंवा अती भूक लागणे, अती तहान लागणे, लघवी होणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसत आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी व आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे,” अशी माहिती डेरवण येथील बी.के.एल. वालावलकर रुग्णालयात नुकतेच दाखल झालेले विख्यात मधुमेह तज्ञ डॉ. वरुण दामले यांनी दिली.

डॉ. दामले यांनी पुणे येथून एम.बी.बी.एस. पूर्ण केले असून, त्यांनी मधुमेह या आजारावर विशेष प्राविण्य (स्पेशलायझेशन) मिळवले आहे. भारताचे प्रख्यात मधुमेह तज्ञ डॉ. विश्वनाथ मोहन(मधुमेहावरील संशोधन याकरता २०११ मध्ये पद्मश्री) (ज्यांनी १९४८ साली चेन्नई येथे देशातील पहिले डायबेटिक युनिट स्थापन केले) यांचे सुपुत्र डॉ. मोहन यांच्याकडे डॉ. दामले यांनी मधुमेहाचे उच्च शिक्षण व धडे गिरवले आहेत. डॉ. दामले आता डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दर आठवड्याला रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत.