मुंबई (सुनील साळवी) : शेतकऱ्याला मामा बनविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.. सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत काल विधानसभेत विरोधकांनी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सभात्याग केला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली.

कृषी योजना, शेतकऱ्यांना न्याय आणि कर्जमाफी बाबत नियम २९३ अन्वये सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केले. मंत्री भरणे यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी विशेष करून आभार मानतो. अडचणीच्या काळात आर्थिक पाठबळ मिळावे यासाठीच सरकारने कर्जमुक्ती योजना आणली आहे. खरंतर कर्जमाफीमुळे सर्वांचे समाधान होईल असे नाही, मात्र सदस्यांच्या सर्व सूचनांचा योग्य तो आदर राखला जाईल असे मी वचन देतो असे ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे त्यांनाही न्याय देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत असे त्यांनी सभागृहात सांगितले.
राज्य सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. लाभार्थी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा आणि एकाही योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकरी हा विकासाचा महत्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. असे सांगताना कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.