मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांप्रमाणेच कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे 66 हजाराहून अधिक रखडलेल्या घरकुलांचा विषय प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत चांगलाच गाजला. निलेश राणे,नाना पटोले सुधीर मुनगंटीवार आदी सदस्यांनी आक्रमक होत ग्रामविकास मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. निधीची कोणतीही कमतरता नसून वर्षभरात १५ लाख घरे बांधू अशी ग्वाही देतानाच लाभार्थीला पाच ब्रास वाळू मोफत देण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांची असून असहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी घोषणा मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. तसेच सिंधुदुर्गात रखडलेला निधी तातडीने वितरित केला जाईल असे वचन त्यांनी दिले.
राज्यातील अपूर्ण घरकुलांचा विषय, तांत्रिक अडचणी आणि लाभार्थींना अनुदानाला विलंब या विषयावरून प्रश्नोत्तराच्या तासात सत्ताधारी सदस्य माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,निलेश राणे काँग्रेसचे नाना पटोले यांनी आक्रमक पवित्र धारण केला.
निलेश राणे म्हणाले, माझ्या मतदारसंघात ३५०० घरकुलांची कामे रखडली आहेत. साडेआठ कोटी रुपयांची बिले मिळालेली नाही. शिवाय वन खात्याच्या जमिनीवर घरे बांधण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट एनओसी देत नाहीत. त्यामुळेही अनेकांना लाभ मिळत नाही. वाळू धोरण ठरलेले नसताना सरकार पाच ब्रास वाळू देणार कुठून? या संदर्भात ग्रामविकास खात्याने महसूल विभागाशी योग्य समन्वय राखून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी आक्रमक होत मांडली.
नाना पटोले यांनीही लोकांना वर्षानुवर्षे पैसे मिळत नसताना मंत्री चुकीची माहिती का देत आहेत? एक लाख ४० हजार इतक्या कमी निधीमध्ये घरकुल होत नाही. हा गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे. इतक्या कमी निधीमुळे अनेक लोकांना कर्ज काढून कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मंत्री या संदर्भात चुकीची माहिती देत आहेत असा जोरदार आक्षेप नोंदवला.