मुंबई : पक्ष पुन्हा एकदा नवीन जोमात उभा करण्याकरिता पक्ष संघटनेत लवकरच बदल करण्यात येणार असून त्यानंतर राज्यभर दौरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून जिल्हास्तरावर काही बदल करण्यात येणार आहेत. नव्या जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निर्णय घेतले जातील. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन करण्यात येईल,असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी एकत्रित आंदोलन आणि संयुक्त दौरे करावेत, अशी सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने एकत्रितपणे जनतेसमोर जाणे गरजेचे आहे,असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.