मुंबई : मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा भाजपा व रा. स्व. संघाचा एकही नेता या दरोड्यावर बोलत नाही. प्रभू रामाला भक्तीभावाने दान-देणग्या देणाऱ्या भाविकांचा हा घोर अपमान आहे.हिंदूंचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या बदमाशांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या प्रवृत्तींचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की,अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या चोरी व पैशाच्या अफरातफरी प्रकरणात चौकशीदरम्यान राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. पण या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांना अटकही केली नाही. या प्रकरणी मुख्य आरोपींना सोडून इतर आठ छोट्या कर्मचा-यांवर चोरी आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधारांना मोकाट सोडून मोदी सरकार “चोर सोडून संन्यासाला फाशी” देण्याच्या प्रयत्न करत आहे.