चिपळूण : सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण यांच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. “राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्य” या विषयावर प्रा. डॉ. डी. टी. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. कदम यांनी आपल्या व्याख्यानात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा सखोल आढावा घेताना सांगितले की, शाहू महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते सामाजिक परिवर्तनाचे महान शिल्पकार होते. त्यांनी समाजातील वंचित, शोषित, बहुजन आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारातून त्यांनी सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती योजना, मोफत शिक्षण तसेच मागासवर्गीय समाजासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
व्याख्यानादरम्यान शाहू महाराजांनी १९०२ साली मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी करून सामाजिक न्यायाच्या चळवळीला नवी दिशा दिली, यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, अस्पृश्यता निर्मूलन, शेतकरी व कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी असल्याचे प्रा. कदम यांनी नमूद केले.
