चिपळूण : एका बाजूला सत्ता असल्याने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी रीघ लागली असताना, चिपळूणमध्ये मात्र वेगळेच चित्र निर्माण झाले आहे. सत्तेकडे पाठ फिरवत अनेक जण मनसेत सामील होणार असून, मनसेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या उपस्थितीत , सोमवारी शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मनसेत जाहीर प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश चिपळूणच्या आगामी राजकारणाला कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या पक्षप्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत पक्ष मजबूत करण्याचे ध्येय ठेवले असून, त्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते सातत्याने जिल्ह्यात येऊन आढावा बैठका, सदस्य नोंदणी तसेच प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुंबई व तालुक्यातील मनसैनिकांच्या एकत्रित बैठका घेतल्या जात असून, या बैठका मनसेचे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई आणि मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या उपस्थितीत होत आहेत. चिपळूण येथे , सोमवार, दि. २९ रोजी दुपारी १२ वाजता अतिथी हॉटेल येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.