चिपळूण : महाराष्ट्रात उघडकीस आलेल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यातील हजारो होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या भविष्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चिपळूण तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी अनेक वर्षे अथक परिश्रम घेत असतात. मात्र पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत होत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारी सुनिश्चित करणारी प्रभावी यंत्रणा शासनाने तातडीने उभी करावी.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कायम ठामपणे उभा आहे. शासनाने या प्रकरणात तातडीने ठोस निर्णय घेऊन दोषींना शिक्षा करावी.