चिपळूण : शहरातील शंकरवाडी परिसरातील नलावडे बंधाऱ्यालगत एका बिल्डरकडून करण्यात आलेल्या अनधिकृत आरसीसी बांधकामामुळे चिपळूण शहराला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक पाण्याचा मार्ग अडवल्याने पुराचे पाणी शहरात घुसू शकते, असा गंभीर इशारा स्थानिक नगरसेवकांनी दिला असून, याप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नलावडे बंधारा हा पुराचे पाणी शहरात शिरू नये यासाठी उभारण्यात आला होता. मात्र, बंधाऱ्यालगत करण्यात आलेल्या आरसीसी बांधकामामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा अडवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित बिल्डरने नलावडे नाला जवळपास पूर्णपणे बुजवल्याचा दावा स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनीही प्रशासनाला जाब विचारत, ‘रेड लाईन आणि ब्लू लाईन क्षेत्र असताना अशा प्रकारचे बांधकाम होतेच कसे? नगररचना विभागाला याची माहिती नव्हती का? संबंधितांना परवानगी कोणी दिली?’ असा सवाल उपस्थित केला. नाल्यालगत इतरही काही बांधकामे आणि घरांचे बांधकाम करण्यात आले असून, याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे. प्रशासनाने आठ दिवसांत काम थांबवून कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल,’ असे नगरसेवक संदीप भिसे यांनी सांगितले.