चिपळूण : बहादूरशेख कळंबस्ते येथील दोन जुने वाशिष्ठी पूल तोडण्यात आले. त्या पुलांचे साहित्य नदीपात्रातच टाकून ठेवण्यात आले आहे. एकीकडे पुराचे पाणी भरू नये म्हणून गाळ काढला जात आहे; परंतु तोडलेल्या पुलाचे साहित्य अजूनही नदीपात्रातच पडून आहे.

कळंबस्ते वाशिष्ठी पुलाजवळ गणपती विसर्जन केले जाते. या नदीपात्रात खराब साहित्य टाकून ठेवल्यामुळे गणपती विसर्जन करताना अडथळा निर्माण होत आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटूनही पाण्यातील साहित्य अद्याप उचलण्यात आलेले नाही. ते तातडीने उचलण्यात यावे, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

कापसाळ येथील इरिगेशन कार्यालयाने सदर नदीपात्रातील पाण्यात जुन्या पुलाचे टाकून ठेवलेले साहित्य तातडीने हटवावे, असे लेखी पत्र मुंबई-गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांना एक वर्षांपूर्वी दिले होते. ठेकेदारांनी काम अर्धवट ठेवले असून ते पूर्ण करून नदीपात्रातील साहित्य उचलण्याच्या सूचना द्याव्यात, असेही कळविण्यात आले होते. तरीदेखील जुन्या पुलाचे टाकलेले साहित्य अद्याप उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

तरी पावसाळ्यापूर्वी हे साहित्य तातडीने हटवण्यात यावे; अन्यथा यंदाच्या गणपती विसर्जनासाठी अडथळा निर्माण होईल, असेही शौकतभाई मुकादम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले आहे.