रत्नागिरी : रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या पूरनियंत्रण कक्षाने मंगळवारी (३० जून) सायंकाळी ५.३० वाजता जाहीर केलेल्या नदी पातळी अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांची पाणीपातळी सध्या सुरक्षित असून कोणतीही नदी इशारा किंवा धोका पातळीच्या जवळ पोहोचलेली नाही.
जगबुडी नदीची पातळी ४.८० मीटर, वाशिष्ठी नदीची १.९० मीटर, शास्त्री नदीची २.८० मीटर, सोनवी नदीची २.३० मीटर, काजळी नदीची ११.९० मीटर, कोदवली नदीची ०.७० मीटर, मुचकुंदी नदीची ०.३० मीटर आणि बावनदीची ३.२१ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. या सर्व नद्यांची पाणीपातळी त्यांच्या इशारा आणि धोका पातळीपेक्षा खूपच कमी असल्याने पूरस्थितीचा कोणताही धोका नसल्याचे चित्र आहे.
