देवगड : कोकणातील शेतकरी पहिल्यांदाच आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडे काहीतरी मागत होता; मात्र त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाच नाही. आंबा बागायतदारांना अवघी २२० रुपयांची नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले आणि त्याचे श्रेयही घेतले जात आहे. एका बाजूला कोकणचा ‘कॅलिफोर्निया’ करण्याच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणून कोकणचे वाळवंट करण्याची तयारी सुरू आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना आमचा विरोध नाही; मात्र अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे. अदानी-अंबानी यांना पोसण्यासाठी कोकणातील माणसाचा बळी देण्याचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही,” असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.

देवगड येथे आयोजित अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जाहीर सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी महादेव जानकर, माजी खासदार विनायक राऊत, मंगेश सावंत, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव नाईक, सुशांत नाईक, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, मकरंद शिंदे, आंबा बागायतदार संघटनेचे आप्पा अनुभवणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महादेव जानकर यांनी, “कोकणात अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आज सर्व काही अदानी-अंबानी यांच्या ताब्यात जात आहे. जनतेच्या हितापेक्षा उद्योगपतींचे हित जपणाऱ्या सरकारविरोधात लोकांनी एकत्र उभे राहिले पाहिजे,” असे सांगत राज्य सरकारवर टीका केली.

माजी खासदार विनायक राऊत यांनी, “अणुऊर्जा प्रकल्प मानवजातीसाठी धोकादायक आहे. राणे यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. कोकणच्या अस्तित्वासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असा इशारा देत प्रकल्प रद्द व्हावा यासाठी मालवणी भाषेत कोकणातील देवस्थानांकडे साकडे घातले. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आंबा बागायतदारांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीवर टीका करत, “जिल्हा परिषदेतही अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर झाला पाहिजे,” अशी मागणी केली.