श्रीवर्धन : एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे श्रीवर्धनमधून! विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणाऱ्या भूमाफियांची मुजोरी आता थेट श्रीवर्धनकरांच्या जीवावर उठली आहे. श्रीवर्धन शहरातील कुंभारवाडा, मच्छी मार्केट आणि जुन्या बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या अतिसंवेदनशील खाडी क्षेत्रातील तब्बल ५ ते ६ एकर क्षेत्रातील नैसर्गिक खारफुटीचा दिवसढवळ्या सफाया करण्यात आला आहे.
​या गुन्हेगारी कृत्यामुळे या वर्षीच्या पहिल्याच मुसळधार पावसात अख्खे श्रीवर्धन शहर पाण्याखाली गेले आहे!
हे चित्र आहे निसर्गरम्य श्रीवर्धनचे… पण आज हे शहर पहिल्याच पावसात जलमय झाले आहे. रोहिदास नगर, वाणी आळी, दादर पूल परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि टिळक रस्ता या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाणी थेट लोकांच्या घरात आणि दुकानात शिरले आहे.
पण ही कोणती नैसर्गिक आपत्ती नाही, तर हा भूमाफियांनी रचलेला ‘मानवनिर्मित’ कट आहे! या खाडी परिसरातील ५ ते ६ एकर अतिसंवेदनशील जमिनीवरील कांदळवने मशीन लावून नष्ट करण्यात आली. त्यावर दगड-मातीचा प्रचंड भराव टाकण्यात आला. उद्देश एकच— या जागेवर टोलेजंग आलिशान निवासी संकुले आणि व्यापारी गाळे उभारून कोट्यवधींचा मलिदा खाणे!
यात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे प्रशासनाच्या भूमिकेवर! महसूल विभाग, वन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभाग एवढा मोठा घोर गुन्हा घडत असताना डोळ्यांवर पट्टी बांधून बसले होते का? विशेष म्हणजे, २४ मे २०२२ रोजीही या भागात अशीच खारफुटी तोड झाली होती. पण प्रशासनाने फक्त कागदोपत्री कारवाईचे नाटक केल्यामुळेच आज भूमाफियांचे धाडस इतके वाढले आहे.
स्थानिक रहिवासी:
“आम्ही आता गप्प बसणार नाही. या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. पर्यावरण कायद्याची ऐशीतैशी करणाऱ्या भूमाफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. हा भराव तात्काळ हटवला नाही तर आम्ही माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून ही लढाई कोर्टापर्यंत नेणार आहोत.” निसर्गाचे रक्षण करणारी खारफुटी नष्ट करून संपूर्ण शहराला धोक्यात आणणाऱ्या या भूमाफियांना प्रशासन तुरुंगाची हवा दाखवणार की नेहमीप्रमाणे फाईली दाबून ठेवणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.