मुंबई : रामरक्षा आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना काल पुस्तक वाचूनही रामरक्षेचे श्लोक म्हणता आले नाहीत. संजय राऊत, तुम्हालाही रामरक्षा म्हणता आली नाही. पक्ष आणि मते वाचवण्यासाठी तुम्ही रामरक्षा आंदोलनाच्या नावाखाली पक्षरक्षा, आमदाररक्षा, नगरसेवकरक्षा आंदोलन करत असलात तरी लक्षात घ्या, तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही कारण तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे विचार आणि हिंदुत्ववाद मान्य नाही.
कितीही नाटकीपणा केलात तरी तुमचा धूर्तपणा, कावेबाजपणा ओळखून असलेली राज्यातील जनता येत्या काळातही तुमच्या अहंकाराची राख निश्चितपणे करेल, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला.
ठेकेदारी, कमिशनखोरी, वसुली हा जनाब संजय राऊत आणि उबाठा गटाचा धंदा आहे. गेली 25 वर्षे मुंबई महापालिका लुटणाऱ्या उबाठा गटाने भाजपाला शिकवू नये. आम्ही रस्त्यावर उतरतो, लोकांची सेवा करतो, मेवा खात नाही, हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे. सहा महिन्यांपासून सत्तेत आल्यावर आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. चुका झाल्या तर त्या सुधारून पुन्हा पुढे जात आहोत आणि मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. संजय राऊत, तुमच्यासारखे आणि तुमच्या पक्षप्रमुखांसारखे घरात बसून राहणारे आम्ही नव्हेत, असे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन पुढे म्हणाले, लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने तेथे तातडीने दुरुस्तीचे काम सुरू आहे. एका तासात 600 मिलिमीटर पाऊस झाल्याने दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड कोसळणे हे सरकारच्या हातात नसते. परंतु ते दुरुस्त करण्याचे काम सरकार युद्धपातळीवर करत आहे.
