उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले असून शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिलेल्या राजीनामा मुळे राजकारणात मोठा स्फोट झाला आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठी खळबळ माजली असून, उरण विधानसभेचे माजी जिल्हाप्रमुख अतुल परशुराम भगत यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
उत्तर रायगडचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून प्रत्येक वेळी होणाऱ्या मनमानी व हुकूमशाही कारभाराला कंटाळून आपण हा निर्णय घेत असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले आहे. अतुल भगत यांनी आपला राजीनामा थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनामा पत्रामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या पत्रात अतुल भगत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आमदार महेंद्र थोरवे यांच्या जाचाला कंटाळून मी शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पक्षात काम करत असताना अंतर्गत वादातून अतुल भगत यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षाचा राजीनामा दिला असला तरी, अतुल भगत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. आपला आदर सदैव माझ्या तसेच माझ्या सहकाऱ्यांच्या मनात कायम राहील आणि आपल्या नेतृत्वात काम करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत त्यांनी शिंदेंचे आभार मानले आहेत.शिवसेना पक्षाचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक, एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून अतुल भगत सर्वांना सुपरिचित आहेत.उरण मतदार संघात शिवसेना पक्ष वाढविण्यात, शिवसेना पक्षाचा तळागात प्रचार व प्रसार करण्यात अतुल भगत यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र अतुल भगत यांनी राजीनामा दिल्याने याचा फटका भविष्यात उरण विधानसभा परिसरात शिवसेना पक्षाला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.