चिपळूण : भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील मौजे टेरव बु. या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपले काम १०० टक्के पूर्ण केले असून, हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
या मोहिमेंतर्गत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या विहित कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरोघरी भेटी देऊन हे पुनरीक्षणाचे काम अत्यंत अचूकतेने पूर्ण केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली तसेच २६५-चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेसाठी मौजे टेरव बु. या गावाची निवड करण्यात आली होती. चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि निवडणूक नायब तहसीलदार रसिका रसाळ यांनी या संपूर्ण कामावर देखरेख ठेवली.
या गावामध्ये एकूण १९५ मतदार असून, त्यामध्ये ९३ महिला आणि १०२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान गावातील सर्व १९५ मतदारांना गणना प्रपत्र (EF) वितरित करण्यात आले होते. त्यापैकी १८७ मतदारांची गणना प्रपत्रे ॲपद्वारे यशस्वीरीत्या डिजिटायझेशन करून ऑनलाइन नोंदविण्यात आली. या विशेष मोहिमेत तांत्रिक अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी नोंदणीस पात्र नसलेल्या ८ प्रपत्रांचे अत्यंत सखोलपणे वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये २ मयत मतदार, ५ दुबार नोंदणी असलेले मतदार आणि १ कायमस्वरूपी स्थलांतरित झालेला मतदार आढळून आला. त्यानुसार कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून मतदार यादी संपूर्णपणे निर्दोष व अद्ययावत करण्यात आली.
या ऐतिहासिक कामगिरीमध्ये सुप्रिया लोखंडे (तलाठी तथा BLO), आस्माकौसर राजअहमद देसाई (पर्यवेक्षक), नारायण चौधर (मंडळ अधिकारी), मधुरा विश्वनाथ साळवी (अंगणवाडी सेविका), सुहास मोहिते (पोलीस पाटील), शुभम उतेकर (ग्राम महसूल अधिकारी), अनिकेत शिर्के (महसूल सहाय्यक – निवडणूक शाखा) तसेच ग्रामपंचायत टेरव बु. यांच्या संपूर्ण पथकाने अहोरात्र मेहनत घेतली. या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून टेरव बु. गावाचे तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे विशेष कौतुक होत आहे.