पुणे : आषाढी वारी पालखी सोहळा २०२६ निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यनगरीतून सासवडकडे प्रस्थान होत असताना हडपसर येथे वारकरी बंधू-भगिनींच्या सेवेसाठी आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम व शिवसेना राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्याशायना एन.सी यांनी विशेष सहभाग नोंदवला. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतः पायी चालत वारकऱ्यांची भेट घेत त्यांनी आपुलकीनं विचारपूस केली.
टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि भक्तिमय वातावरणात श्रेया योगेश कदम यांनी वारकरी बंधू-भगिनींशी आत्मीयतेने संवाद साधत वारीतील अनुभव जाणून घेतले. विशेषतः महिला वारकरी भगिनींशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेसह आवश्यक सोयी-सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांच्या या साध्या, संवेदनशील आणि सेवाभावी भूमिकेचे वारकरी समाजातून विशेष कौतुक करण्यात आले.
शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र वारकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी थेट संवाद साधणाऱ्या श्रेया योगेश कदम यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
यावेळी अनेक वारकरी भगिनींनी श्रेया ताईंशी मनमोकळा संवाद साधत शासनाच्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असल्याचे मत श्रेया योगेश कदम यांनी व्यक्त केले.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जिवंत वारसा असून त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे ही मोठी गोष्ट असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भक्ती, सेवा आणि संस्कारांचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात श्रेया योगेश कदम यांच्या सेवाभावी सहभागाने वारकरी बंधू-भगिनींना विशेष आत्मीयतेचा अनुभव मिळाला.
हरिनामाच्या अखंड जयघोषात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे हडपसर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली..