मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या छोटेखानी शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे आमदार, मंत्री उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडल्या आणि सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते, आमदार ,लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी धरल्यानंतर लोकभावनेचा आदर करून सुनेत्राताई यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास संमती दिली. त्यानंतर शुक्रवारी रात्री त्या मुंबईकडे रवाना झाल्या. आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची विधानभवनात बैठक झाली. त्यामध्ये पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी पार पडला. त्या राज्याच्या १७ व्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.अत्यंत साधेपणाने हा विधी पार पडला.

यावेळी अमर रहे अमर रहे.. अजितदादा अमर रहे अशा जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. शपथविधीनंतर नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीला रवाना होणार असून अजितदादांचा दशक्रिया विधी होईपर्यंत त्या बारामतीतच राहणार आहेत असे सांगण्यात आले. राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा ताई यांनी खासदारकीचा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींकडे दिला असून हा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. ६२ वर्षीय सुनेत्राताई या कॉमर्सच्या पदवीधर आहेत. लोकभवनात झालेल्या या बारा मिनिटांच्या शपथविधी सोहळ्याला दीडशे जणांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र पवार कुटुंबीयांचे आधारस्तंभ खासदार शरदराव पवार व खासदार सुप्रिया सुळे हे मात्र शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY