चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान निर्माण केले आहे. हे मैदान औद्योगिक वसाहतीसाठी राखीव आहे. आता तिथे नगरपरिषद वनराई निर्माण करण्यासाठी तयार झाली आहे. गेल्या काही वर्षात आपल्या चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मात्र त्यासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत.
ज्या मैदानाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले आहे, तिथे दुर्दैवाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा मात्र उभारण्यात आला नाही. चिपळूण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. सुनिल कुलकर्णी यांनी यासाठी नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ यांची भेट घेऊन पुतळा उभारण्याची मागणी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आणि चिपळूणचे अतिशय जवळचे नाते होते, शहरातील धर्मशाळेत त्यांनी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चिपळूणचे अनेक नागरिक या सहभोजनात सहभागी झाले होते. तसेच चिपळूण नगरपरिषदेने त्यांचा सत्कार केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा आणि या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी श्री. सुनिल कुलकर्णी यांनी केली. श्री. सुनिल कुलकर्णी यांनी दिलेल्या पत्राची नक्कीच दखल घेऊन लवकरात लवकर आपण त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन नगराध्यक्ष श्री. उमेश सकपाळ यांनी दिले.
