खेड (प्रतिनिधी) : – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव, श्री. विश्वास निकम यांचे वडील, शिवसेना ठाणे महानगरप्रमुख श्री. महेश कदम यांचे सख्खे मामा, शिवसेना खेड तालुकाप्रमुख श्री. सचिन निकम यांचे आजोबा तसेच ठाणे भूषण पुरस्कार सन्मानित, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे कुळवंडी येथील श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे माजी अध्यक्ष, खेड तालुक्यातील कुळवंडी गावचे सुपूत्र कै. कॅप्टन जयसिंगराव काशीराम निकम यांचे रविवारी ७ जून रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ९० वर्षाचे होते.
भारतीय सैन्यात उल्लेखनीय सेवा बजावत त्यांनी गोवा मुक्ती लढा (१९६०), चीन लढाई (१९६२), लाहोर येथे पाकिस्तान युध्द (१९६५), बांगला देश मुक्ती लढाई (१९७१) अशा अन्य एकूण ६ युध्दात सहभाग नोंदवलेल्या कॅप्टन निकम यांनी देशसेवेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले होते. सेवानिवृत्ती नंतर सुध्दा स्वस्थ न बसता सामाजिक जाणिवेने प्रेरीत होऊन माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या खेड, दापोली, मंडणगड तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहून सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटंबीयांना पेन्शन व तत्सम माधमातून सदैव कार्यरत राहिले. कुळवंडी गाव व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या सहकार्याने श्रीशिवशंकर माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून शैक्षणिक कार्यात देखील त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.
कॅप्टन जयसिंगराव निकम यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह सामाजिक, राजकीय आणि माजी सैनिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. सायंकाळी ठाणे खोपट येथील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर जवाहर बाग स्मशानभुमीत माजी सैनिक दलाकडून सलामी देत भावपूर्ण वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना (ठाकरे) ठाण्याचे माजी खासदार श्री. राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदार दिघे, शिवसेना प्रवक्ते श्री. अनिश गाढवे तसेच समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह हजारो समाजबांधव सहभागी होते.
कुळवंडी गावचे सुपुत्र ., ठाणे भूषण पुरस्कार सन्मानित ;कॅप्टन जयसिंगराव निकम यांचे वृध्दापकाळाने निधन !
