मुंबई : याआधी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोरले गेल्याने त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. तीनवेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रहिताचे अनेक निर्णय घेतल्यानेच सातत्याने जनतेने त्यांना आशीर्वाद दिले. त्यामुळे यापुढे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते म्हणून त्यांचा विक्रम होईल यात अजिबात शंका नाही, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इन्फ्रामॅन म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केले हे महाराष्ट्र ओळखतो आहे. सर्वाधिक वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम आहे. बीडीडी चाळीत घर देणे, अटल सेतू, मुंबईची मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग असे अनेक लोकहिताचे प्रकल्प देवाभाऊंच्या नावावर आहेत. संजय राऊत, तुमच्या नावावर काय आहे? पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेत तुम्ही केलेला राष्ट्रद्रोहाचा आणि उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी वडिलांच्या विचारांना तिलांजली देत केलेला अफजलखान, औरंगजेबाच्या दाढ्या कुरवाळण्याचा विक्रम मात्र कोणीही मोडू शकणार नाही, असे श्री. बन म्हणाले.
लाडकी बहिण योजना सुरू केल्यापासून संजय राऊत यांचा पोटशूळ का उठतो आहे , असा सवाल करून श्री. बन म्हणाले, या योजनेला विरोध केलात तर या लाडक्या बहिणी तुम्हाला असा शाप देतील की तुम्ही पुन्हा राजकारणात उभे राहू शकणार नाहीत. काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून न्यायालयातही गेली होती. पण जोपर्यंत भाजपा – महायुतीचे सरकार आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही. आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले जातात. आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देऊ आणि हे आश्वासनही तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही पूर्ण करणार आहोत.