चिपळूण : “काय करायचे ते करा, पण राष्ट्रीय महामार्गाची लक्तरे वेशीवर टांगू नका. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी गुहागर–विजापूर मार्गावर कोट्यवधी रुपयांची उधळण करूनही रस्त्यावर खड्डेच खड्डे असतील, तर हा पैसा गेला कुठे? निधी लाटून झाला असेल आणि खड्डे भरण्यासाठी निधी नसेल, तर आम्ही भीक मागून पैसे देऊ. मात्र, आठ दिवसांत खड्डे भरले नाहीत, तर २० जुलै रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह ‘भीक मागो’ आंदोलन करून निधीचे गाठोडे अधिकाऱ्यांच्या गळ्यात बांधू,” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला.
राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर–विजापूर मार्गावरील बहादूरशेख ते कुंभार्ली घाट या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, जागोजागी कोसळलेली काँक्रीटची गटारे आणि त्यात तुंबणारे पाणी यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. यासंदर्भात आज मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांच्यासह मनसैनिक पप्पू आंब्रे, गणेश खेडेकर, मिलिंद कदम, राजेंद्र गोंजारी, आबा हटकर, विनोद चिपळूणकर, मंगेश महाडिक, उमेश पवार, सुनील मोडक, चाँद शहा, मुस्ताकीन चाँद शहा, सुलेमान शेख, भाई सुर्वे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
बहादूरशेख ते पिंपळी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात होता. तर, त्यापुढील कुंभार्ली घाटापर्यंतचा रस्ता सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या दोन्ही टप्प्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यासंदर्भात राजू खेतले यांनी उपअभियंता श्री. मुल्ला आणि शाम खुणेकर यांना जाब विचारला.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले म्हणाले, “आम्हाला निधीचा हिशेब नको आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी पाठवलेली पत्रेही दाखवू नका. आम्हाला त्यामध्ये कोणताही रस नाही. आम्हाला फक्त रस्ता सुस्थितीत हवा आहे. जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत रस्त्याच्या बाजूची साफसफाई करण्याची कामे करू देणार नाही. आधी खड्डे भरा, त्यानंतर इतर कामे करा. ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामे काढून रस्त्याची वाट लावू नका. सोमवारपर्यंत या मार्गावरील सर्व खड्डे बुजवा; अन्यथा २० जुलै रोजी शहर आणि ग्रामीण भागात ‘भीक मागो’ आंदोलन करून निधीचे गाठोडे अधिकाऱ्यांच्या गळ्यात बांधू.”