चिपळूण : कोकणातील भातशेतीला मजूर टंचाईचे मोठे आव्हान असताना, चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील प्रगतशील शेतकरी रुपेश भुवड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून भात लागवडीत नवा आदर्श निर्माण केला आहे. शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान 2024-25 अंतर्गत 50 टक्के अनुदानावर चार-रो (फोर रो) भात लावणी यंत्र खरेदी केल्यानंतर, यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी तब्बल 10 ते 15 एकर क्षेत्रावर पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने भात लावणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
गेल्या वर्षी प्रायोगिक स्वरूपात या यंत्राचा वापर करून समाधानकारक परिणाम मिळाल्यानंतर यंदा मोठ्या क्षेत्रावर यांत्रिक लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या प्रयोगामुळे वेळ, मजुरी आणि उत्पादन खर्चात मोठी बचत होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचेही लक्ष या आधुनिक पद्धतीकडे वेधले गेले आहे.
रुपेश भुवड यांचा हा आधुनिक उपक्रम केवळ स्वतःपुरता मर्यादित नसून, त्यांनी या तंत्रज्ञानाचा विस्तार शेजारील गुहागर तालुक्यातही करण्याचा निर्णय घेतला आहे. गुहागरमधील काही प्रमुख प्रक्षेत्रांवर देखील ते या भात लावणी यंत्राद्वारे इतर शेतकऱ्यांना लागवड करून देणार आहेत, ज्यामुळे परिसरातील यांत्रिकीकरणाला मोठी गती मिळणार आहे. दिनांक 11 जुलै 2026 रोजी दळवटणे येथील त्यांच्या प्रक्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लावणीचा मुख्य शुभारंभ करण्यात आला. या विशेष प्रसंगी कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्राला भेट देऊन या आधुनिक प्रक्रियेची पाहणी केली व शेतकऱ्याचे कौतुक केले. यामध्ये चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, खेर्डी मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी, व उपकृषी अधिकारी संतोष भोसले यांच्यासह परिसरातील अनेक उत्सुक शेतकरी उपस्थित होते.
भातशेतीत आधुनिकतेची पाऊलवाट दळवटणे येथील शेतकरी रुपेश भुवड ठरले प्रगतशील शेतीचे रोल मॉडेल….
