मुंबई : अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय संवयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएस मधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्कासित करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे..
छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, संभाजीनगर शहर काँग्रेसच अध्यक्ष अक्रम सय्यद अब्बास, प्रवक्ते हनमंत पवार,
सुरेंद्र घोडसकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राम मंदिराचा वापर भाजपा व रा. स्व. संघाने स्वतःच्या फायद्यासाठी केला. मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा मोठा इव्हेंट करून सर्व श्रेय आपल्याच पदरात कसे पडेल यासाठी आटापिटा केला पण त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. श्रीरामाला भक्तिभावाने दान दिलेल्या पैशांवरच या लोकांनी दरोडा टाकला. या दरोड्याला सर्व विश्वस्त मंडळच जबाबदार आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी कोषाध्यक्ष यांचीच आहे पण दरोड्याशी माझा संबंध नाही, असे जर ते म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे. विश्वस्त मंडळाची आताची भूमिका ‘तो मी नव्हेच’ अशी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
