मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची 48 हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत सत्कार सोहळ्यात बोलताना जाहीर केले. तुतारींच्या गजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले. शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या पाटीवर त्याला नवा इतिहास लिहिता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाने राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात श्री. फडणवीस यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सोहळयाला उत्तर देताना मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या परिवर्तनाचा व्यापक आराखडा राज्यासमोर सादर केला.

शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्याची वेगवेगळे प्रयोग करावे लागतील, त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढवावी याकरिता सरकार प्रयत्न करणार आहे. म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे जाण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना सुमारे 40 हजार कोटींची कर्जमाफी देताना सरकारला तिजोरीतून निधी उभारावा लागतो. उद्योग आणि सेवाक्षेत्रात मोठी गुंतवणूक आणली तर मोठ्या प्रमाणात कराच्या रूपाने तिजोरीत येणारा पैसा शेतीच्या क्षेत्रात गुंतवू शकलो तर येत्या दशकात शेतीचे क्षेत्र स्वयंपूर्ण होऊन आपल्याला पैसा देईल, आणि त्यासाठी पैसा द्यावा लागणार नाही. राज्यात 52 टक्के भाग अवर्षणप्रवण असताना दुसरीकडे अनेक भागांत पावसाचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते. गोदावरी, तापी खोऱ्यांत हे पाणी यावे याकरिता वैनगंगा, नळगंगा सारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येत असून वाहून जाणारे पाणी उचलले जाईल व सुमारे 24 नवी धरणे व 16 जुन्या धरणांची उंची वाढविली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही. याचवर्षी हे काम पूर्ण करण्याकरिता वेगवान प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे 200 टीएमसी पाणी वाहून जाणारे पाणी वळणबंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही आहे. उल्हास खोऱ्यात वाहून जाणारे पावणेतीनशे टीएमसी पाणी उचलून वेगवेगळ्या माध्यमांतून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे कामही हाती घेतले आहे.
केवळ स्वप्ने पाहून चालत नाही. ती पूर्ण करायची हा माझा ध्यास आहे. अजून सहा लाख कोटींची कामे करण्याची योजना आहे. एकदा ही कामे पूर्ण झाली, तर महाराष्ट्रातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतीच्या परिवर्तनासाठी भविष्याचा विचार करण्याचे सरकारचे धोरण आहे. टीका करणाऱ्यांना कोणी लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वालाच लक्षात ठेवले जाते. म्हणून या कामांच्या माध्यमातून कृषीक्षेत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणे हा आमचा ध्यास आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले, आणि शेतकऱ्यांनी शिट्ट्या, टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.