मुंबई : MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच व्हाव्यात; ९ दिवसांच्या ऐतिहासिक आंदोलनाचा तात्पुरता समारोप, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. सतेज (बंटी) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुख्यालयासमोर, सीबीडी बेलापूर येथे ८ जुलै ते १६ जुलै २०२६ या कालावधीत सलग नऊ दिवस साखळी उपोषण, धरणे आंदोलन आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले. आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. भुजबळ यांच्या हस्ते आंदोलनाचा तात्पुरता समारोप करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आबा दळवी, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवा दल, महिला काँग्रेस, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी, विविध काँग्रेस आघाड्या-सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्यभरातील विद्यार्थी प्रतिनिधींनी केले.

विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा ऑनलाईन (CBT) व Normalization पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. पेपरफुटी, तांत्रिक अडचणी, पारदर्शकतेवरील प्रश्न आणि समान संधीच्या तत्त्वावर होणारा परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली की MPSC च्या सर्व आगामी परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घेण्यात याव्यात.

नऊ दिवसांचा ऐतिहासिक संघर्ष

गेल्या नऊ दिवसांत विद्यार्थी पाऊस, उन्हाची पर्वा न करता पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहिले. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा करून विद्यार्थ्यांची भूमिका सविस्तर मांडली. मुख्यमंत्री कार्यालय, राज्य शासन आणि आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ऑगस्ट २०२७ पर्यंत ऑफलाइन परीक्षांबाबत भूमिका जाहीर करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांची मूळ मागणी कायमस्वरूपी ऑफलाइन परीक्षा ही असल्याने ही घोषणा अपुरी असून विद्यार्थी आणि काँग्रेस पक्षाला मान्य नाही.