पोलादपूर (शैलेश पालकर) : गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ, सडे, किनेश्वर पेठवाडी, ओंबळी आणि क्षेत्रपाळ या गावांमध्ये जमिनीला भेगा पडल्या तसेच दरडी कोसळल्या आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारला सर्व माहिती देऊन आपत्ती निवारणाचा अहवाल तयार करून शासनाला दिल्यानंतर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यात येईल. या संदर्भात महाड येथे शुक्रवारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी योजना व खारजमीन विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
पोलादपूरचे सभापती अविनाश शिंदे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख संजय मोदी, तानाजी निकम, अनिल भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, माजी सभापती शैलेश सलागरे, कृष्णा नरे, राजेश डांगे, युवा सेना तालुका प्रमुख विक्रम भिलारे, संपर्क कार्यालय प्रमुख सुनील तळेकर, तहसीलदार कपिल घोरपडे, पं.सं. अभियंता कांबळे, विस्तार अधिकारी हंबीर, कृषी विभागाचे पाटील, सडे ग्रामपंचायत अधिकारी त्रिशीला गंभीरे आदींनी दौऱ्यामध्ये सहभागी राहून ग्रामस्थ आणि प्रशासनासमवेत मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत चर्चा केली.
सडे गावाच्या हद्दीतील घरांच्या जोत्याला तडे गेले असून अतिवृष्टी काळात या तड्यांमधून पाणी घरांमध्ये आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नाणेघोळ येथे जमिनीला पडलेल्या भेगांमुळे लोकवस्तीला देखील धोका पोहोचल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी मंत्री गोगावले यांना सांगून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी दर्शवली. किनेश्वर पेठवाडी येथे डोंगरामध्ये जमिनीला भेगा पडून भविष्यात तेथील घरे दरडग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगून घरांच्या मागील बाजूला डोंगर आणि पुढे नदी असल्याने स्थलांतरित कुठे व्हायचे हे शासनानेच ठरवावे अशी भूमिका घेतली. क्षेत्रपाळ येथे लोकवस्तीच्या खालच्या बाजूला असलेल्या डोंगरातून प्रचंड प्रमाणात सुमारे 1200 मीटर हून अधिक लांबीचे दगड कोसळल्याने संपूर्ण लोकवस्ती धोकादायक परिस्थितीत असल्याचे मत मंत्री गोगावले यांनी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याकडे व्यक्त करून या सर्व संभाव्य धोक्यांसह त्या त्या गावांमध्ये करायच्या उपाय योजनांबद्दल शासनाला अहवाल सादर करा, असे आदेश दिले.
यावेळी मंत्री गोगावले यांनी अनेक वर्ष अनेक पिढ्या या गावांमध्ये आणि घरांमध्ये राहिलेल्या लोकांना संभाव्य धोक्याची पर्वा नसते. अशावेळी त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासंदर्भात शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या धोकादायक परिस्थितीतील गावांमध्ये ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून भविष्यात देखील त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन होण्याची आवश्यकता असल्याने आपण शासनाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यात अधिकाधिक पुनर्वसन वसाहती उभारण्या संदर्भात प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नद्यांमध्ये पावसापूर्वीच केलेल्या गाळ उपशामुळे 2005आणि 2021 सारखी महापुराची परिस्थिती उद्भवली नसल्याबद्दल मंत्री गोगावले यांनी समाधान व्यक्त केले.